केंद्रातील सत्तेत सहभागी असलेला आणि राज्यातील महायुतीत देखील असलेल्या रिपाइं आठवले गटाला सध्या जागावाटप करताना महायुतीने पुर्णपणे अडगळीत टाकलेले दिसत आहे. यावरून आता रिपाइं आठवले गटाचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महायुतीला निर्वाणीचा इशारा दिला आहे. आठवले यांनी महायुतीला दोन-तीन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
जागावाटपात विचार न झाल्याने नाराज झालेल्या रामदास आठवले यांनी महायुतीला इशारा देताना म्हटले की, महायुतीमध्ये असूनही आम्हाला राज्यात मंत्रिपद देण्यात आलेले नाही. लोकसभेच्या दोन जागा आम्ही मागितल्या आहेत, मात्र साधे चर्चेलाही बोलाविले जात नाही. त्यामुळे महायुतीमध्ये आम्ही नाराज आहोत. पुढील दोन-तीन दिवसांत पुढील भूमिका घेऊ.
रामदास आठवले म्हणाले, राज्य सरकरच्या शासकीय कार्यक्रमात माझा फोटो कुठेही लावला जात नाही. आमच्या कार्यकत्र्यांना कुठेही विश्वासात घेतले जात नाही. आंध्र, तामिळनाडू, आसाम या ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढत आहोत. आम्ही ज्यांच्या सोबत जातो, ते सत्तेत येतात. सोलापूरच्या जागेसाठी आम्ही आग्रही होतो. त्याठिकाणी आमचा उमेदवार तयार होता. मात्र, भाजपने उमेदवार जाहीर केला. मला महाविकास आघाडीची ऑफर होती, पण मी नाकारली. महाविकास आघाडीचे अनेक नेते माझ्या संपर्कात होते, असा गौप्यस्फोट आठवले यांनी केला.
आमच्या पक्षाला दोन महामंडळ, एक विधानपरिषद सदस्य, विधानसभा निवडणुकीत ४० जागा आणि लोकसभेला दोन जागा आम्हाला हव्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असे बैठकीत ठरल्याची माहिती आठवले यांनी दिली.
आठवले म्हणाले, संविधान बदलण्याचा प्रयत्न केल्यास मंत्रिपद सोडल्याशिवाय राहणार नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. नवे कायदे केले, म्हणजे संविधान बदलणे होत नाही.