राहुल नार्वेकर यांचा निकाल हास्यास्पद आहे. नार्वेकरांनी १०वी सूची काढून टाकावी. महाराष्ट्राच्या राजकारणाचे कसे वाटोळे लावलेय त्याचे उत्तम उदाहरण आजचे वाचन होते. राहुल नार्वेकर धुतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत, अशा शब्दात आपला संताप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालानंतर व्यक्त केला. ते पत्रकारांशी बोलत होते.
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला. अजित पवार यांचा गट खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून दोन्ही गटाचे आमदार पात्र आहेत, असे म्हणत नार्वेकर यांनी शरद पवार गटाच्या सर्व याचिका फेटाळल्या. यावर आता विविध संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, विधानसभेचे अध्यक्ष म्हणाले की ते दहाव्या अनुसूचीकडे कॅलिडोस्कोपद्वारे पाहत आहेत. युती आघाडी होतात किंवा तुटतात हे राजकारण आहे. सर्वच कृत्ये किंवा आचरण हे पक्षांतर मानले जाऊ शकत नाही. म्हणजेच, कायद्याच्या वरचे एक नवे राजकीय तत्वज्ञान महाराष्ट्रात जन्माला आले आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, कायद्याची पायमल्ली कशी करावी, सोयीचा निकाल कसा द्यावा, हे राहुल नार्वेकर यांच्याकडून शिकावे. सत्तेत जाण्याच्या अजित पवारांच्या कार्यक्रमाला धुतराष्ट्रांनी उघड पाठिंबा दिला. त्यांना सगळ्यातून बाहेर काढले. आम्हालाही काढले, मात्र आम्हाला त्याचा आनंद नसून महाराष्ट्रात जे गैर होत आहे, त्याचे दु:ख आहे.