पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०२ : महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या वतीने एक्साइड इंडस्ट्रीज चिंचवड येथील कायमस्वरूपी कामगारांनी दि. ३० पासून संप पुकारण्यात आलेला आहे. या आधी देखील संघाने संप पुकारत असल्याची नोटीस कंपनीला दिली होती त्यानंतर संपाला तात्पुरती स्थगिती सुद्धा देण्यात आली होती
दि. २४ मे रोजी सह्याद्री अतिथी ग्रह मलबार हिल, मुंबई येथे कामगार मंत्री महोदय यांच्यासोबत एक बैठक आयोजित करण्यात आली. त्या बैठकीस कंपनी व्यवस्थापना तर्फे सर्व अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर संघटना आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये चर्चा झाली. गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये संघटनेने व्यवस्थापनाला सकारात्मक प्रतिसाद दिला पण व्यवस्थापन आपले धोरण कायम ठेवत कामगारांच्या हिताच्या आणि कंपनीच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून जाचक अटी संघटनेसमोर मांडत आहेत.
यामुळे असे दिसून येते की व्यवस्थापन तडजोड करण्यासाठी तयार नाहीत या कारणामुळे एक्साइड इंडस्ट्रीज चिंचवड येथे संघटनेच्या सर्व कायमस्वरूपी कामगारांनी दि. ३० पासून बेमुदत संप पुकारला आहे. तोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा संप असाच सुरू राहील असे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाने माध्यमांशी बोलताना सांगितले.
काय आहेत संपाची कारणे ?
१. कंपनीतील बहुसंख्य कायम कामगार यांनी त्यांच्या पसंतीने स्थापन केलेल्या कामगार संघटने सोबत चर्चा न करणे.
२. कर्मचारी मृत्यू फंडाची रक्कम कामगाराच्या पगारातून परस्पर कपात करणे.
३. कायम कामगार यांच्याविरुद्ध खोट्या तक्रारीच्या आधारे आरोप पत्र जारी करणे, सेवेतून निलंबित करणे, शिस्तभंगाची कारवाई करणे, संघटनेच्या स्थानिक कार्यकारणी सदस्यावर आकासबुद्धीने प्रशासकीय कारवाई करणे.
४. सर्वसामान्य कायम कामगारांवर कामगार संघटनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन महाराष्ट्र लेबर युनियनचे किंवा अंतर्गत युनियनचा सभासद होण्यासाठी दबाव टाकणे आणि शिस्तभंगाची कारवाई करण्याची धमकी देणे.
५. कायम कामगार यांनी पसंतीने स्थापन केलेल्या संघटनेच्या बाबीत ढवळा ढवळ करणे आणि कंपनी आस्थापनेच्या आवारात औद्योगिक शांततेस बाधा, इजा निर्माण करून त्याचा आरोप कामगार व संघटनेवर लावणे.
६. कामगारांना इतर शाखेमध्ये बदलीचा धाक दाखवून कवडीमोल रक्कम देऊन स्वेच्छा निवृत्ती घेण्यास भाग पाडणे.
७. करारात ठरल्याप्रमाणे कायम कामगारांना काम न देता कंत्राटी कामगारांच्या मार्फत काम करून घेतले जात आहे.
८. संघटनेचे सभासद आणि इतर कामगार यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेले शिसे लेड यांचे प्रमाण कमी करणे करिता उपाययोजना करण्यासाठी दुर्लक्ष करणे आणि त्यावर चर्चा करण्यास नकार देणे.
९. कायम कामगार यांच्या रास्त कायदेशीर मागण्यावर कोणताही प्रतिसाद न देणे.
कंपनी आमच्या कामगार संघाला मान्य करून घेत नाही व निलंबित त्याचप्रमाणे बदल केलेल्या कामगारांना पुन्हा चिंचवड येथील युनिटवर रुजू करत नाही तोपर्यंत आमच्या संपर्क कायम राहणार आहे असे वक्तव्य कामगारांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.












