छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
दि.१६ : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यासाठी निधीच्या पॅकेजची घोषणा केली.
आज पार पडलेल्या बैठकीत मराठवाड्यातील ३५ सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता देण्यात आली आहे. नदी जोड प्रकल्पासाठी १४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर पश्चिमवाहिनी नद्यांचं पाणी गोदावरी नदीत सोडण्यासाठी १३ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
सरकार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत १२,९३८ कोटी रुपये, पशुसंवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसायासाठी ३३१८ कोटी, तर नियोजन, ग्रामविकास आणि परिवहनावर प्रत्येकी १ हजार कोटींहून अधिक निधी खर्च करणार आहे.मात्र राज्यात पिकांची स्थिती गंभीर असतानाही दुष्काळ जाहीर करण्याबद्दल सरकारकडून अजून तरी कोणतही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.












