पुणे प्रतिनिधी
पुणे दि. ०५ : सिंहगड रोड येथील रायकर मळा परिसरात नीलायम टॉकीज समोर एका महावितरणच्या तरुण वरिष्ठ तंत्रज्ञाचा भर दिवसा धारदार शस्त्राने वार करून करत खून करण्यात आला होता. गोपाळ कैलास मंडवे (वय- ३२ वर्षे रा.ओवी अंगण कॉलनी, जाधव नगर, रायकर मळा) असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार तासात आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन विरोधी पथकाने केली आहे.
सिधांत दिलीप मांडवकर (वय १९ रा. पोकळे वस्ती, धायरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर आरोपी एस.एन.डी.टी कॉलेज समोर, कर्वे रोड येथे थांबला असल्याची माहिती पोलीस अंमलदार धनंजय ताजणे यांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीने सदरचा गुन्हा काबुल केला आहे. आरोपी विरोधात सिंहगड पोलीस स्थानकात भा.द.वि कलम ३०२ महा.पोलीस अधिनियम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कार्यवाहीसाठी सदर आरोपीला सिंहगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सह पोलीस आयुक्त (गुन्हे -१) सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक 1 वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलीस उपनिरीक्षक शाहीद शेख, पोलीस अंमलदार प्रदीप राठोड, मॅगी जाधव व गणेश ढगे शिवाजी सातपुते, नारायण बनकर यांनी केले आहे.












