पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०२ : महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंत्यावर लाच घेतल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे.ही घटना चतुर्श्रुंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
रवींद्र नानासाहेब कानडे ( वय ३७, सहाय्यक अभियंता,महावितरण कार्यालय उपकेंद्र, बाणेर ) असे आरोपीचे नाव असून फिर्यादीने त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी हे सरकारी विद्युत ठेकेदार म्हणून काम पाहतात.त्यांना आर.एम.सी प्लांट साठी विद्युत पुरवठ्याचे काम मिळाले होते. त्यांनी हे काम शासकीय योजनेच्या १.३ टक्के तत्वाच्या नियमानुसार पूर्ण केले आहे.तरी आरोपी यांनी या कामाच्या पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी फिर्यादींकडे पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी पंचासमक्ष केली.त्यांना ही रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्यावर चतुर्श्रुंगी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
आरोपीवर भादवी कलम भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर हे करत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.












