पुणे प्रतिनिधी
पुणे, दि. २२ : आकाश सूर्यवंशी टोळीतील प्रमुखासह एका साथीदारावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या अंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची संघटित गुन्हेगारी विरुद्ध ६४ वी मोक्का कारवाई आहे.
आकाश ज्ञानेश्वर सूर्यवंशी टोळी प्रमुख (वय २५ रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर, कात्रज), लोकेश मुकुंदा महाजन (वय २४ रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर, कात्रज, मु.पो. खेडी बुद्रुग, जळगाव) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पार्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत (दि.२३) ऑगस्टच्या रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी महिला रिक्षातून प्रवास करत असताना मोटार सायकल वरून येणाऱ्या दोन इसमांनी गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओढून पसार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आरोपीं विरोधात गुन्हा दाखल केला होता.
आकाश सूर्यवंशीवर ३१ गुन्हे तर लोकेश महाजन याच्या वर ८ गुन्हे दाखल असून साथीदारासह संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली होती. सदर परिसरातील नागरिकांना धमकी देऊन, धाकदपटशा दाखवून, जुलूम जबरदस्ती करुन, अवैध मार्गाने गुन्हेगारी कृत्य चालू होते. तसेच परिसरात दहशत निर्माण करून गंभीर गुन्हे केले होते. पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी पोलीस उप आयुक्त सुहेल शर्मा यांच्या मार्फत अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील यांच्याकडे सादर केला. अर्जाची छाननी करून मोक्का कारवाई केली आहे. पुढील तपास सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त सोहेल शर्मा, सहायक पोलीस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे,पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे पोलीस उपनिरीक्षक जगदाळे, पोलीस अंमलदार दिपक लोधा, महेश चौगुले, गोरख मादगुडे, राजू जाधव, कुंदन शिंदे, जगदीश खेडकर यांच्या पथकाने केली.












