पिंपरी – सिंहगड परिसरात रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरण्याच्या तीन घटना घडल्या होत्या. या गुन्ह्यांचा तपास करुन सिंहगड रस्ता पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली. त्याच्याकडून ७ लाख ६० हजार रुपये किंमतीचे १५.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करुन आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. सुमित गोविंद इंगळे (वय-२८ सध्या रा. त्रिपाठी अपार्टमेंट, मारुजी, हिंजवडी मुळ रा. श्रीपतपिंपरी ता. बार्शी, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
मागिल काही दिवसांपासून पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यातच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याच्या घटना घडल्या होत्या. दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाने परिसरातील २०० ते २५० सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासून आरोपीचे नाव निष्पन्न केले.
तपास पथकातील पोलीस अंमलदार देवा चव्हाण, सागर शेडगे, राजु वेगरे यांना माहिती मिळाली की, प्रयेजा सिटी रोडवरील गिरिजा हॉटेलच्या बाजूला असणाऱ्या बस स्टॉप जवळ वडगाव येथे एक तरुण दुचाकी घेऊन थांबला आहे. त्याने आनंदनगर येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसका मारुन चोरून नेली होती. तपास पथकाने त्याला शिताफिने ताब्यात घेतले. त्यानेच आनंदनगर येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरुन नेल्याचे तपासात निष्पन्न झाले.
आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर करुन पोलीस कस्टडी रिमांड घेऊन अधिक चौकशी केली. सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, अलंकार, चतु:श्रृंगी, रावेत पोलीस ठाण्यातील आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आठ गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार बाबा उत्तेकर, संजय शिंदे, तानाजी तारु, राजु वेगरे, विकास बांदल, अमोल पाटील, अविनाश कोंडे, विकास पांडोळे, देवा चव्हाण, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, सागर शेडगे, स्वप्निल मगर, विनायक मोहीते, अक्षय जाधव, शिरिष गावडे यांच्या पथकाने केली आहे.