पुणे : मेट्रोमार्गाच्या उदघाटनानंतर धावलेल्या पहिल्याच मेट्रोचे स्टिअरिंग दोन महिलांच्या हाती होते. प्रतीक्षा माटे आणि पूजा काळे यांना हा बहुमान मिळाला आहे. रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडीदरम्यान पूजा, तर रामवाडी ते रुबी हॉल क्लिनिकदरम्यान प्रतीक्षा यांनी मेट्रो चालविली.
प्रतीक्षा यांनी सांगितले की, ‘मी यापूर्वी वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या मार्गावर मेट्रो चालवली आहे. त्यानंतर आज माझ्याकडे रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मार्गाची जबाबदारी देण्यात आली होती. आजचा प्रवास माझ्यासाठी मोठा आनंद देणारा होता. यानिमित्ताने एक वेगळा अनुभव मिळाला.’ प्रतीक्षा मूळच्या नागपूरच्या आहेत. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. प्रशिक्षणानंतर त्या मेट्रोत रुजू झाल्या.
पूजा यांनी सांगितले की, ‘आजचा प्रवास वेगळा अनुभव देणारा होता. उद्घटनाच्या दिवसाबद्दल मोठी उत्कंठा होती. प्रवाशांनी आमचे खूप कौतुक केले, याचा आनंद वेगळाच आहे. या मार्गावर गर्दी असते. त्यात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचाही समावेश असतो. ते सर्वजण आवर्जून संवाद साधतात.’’ पूजा यासुद्धा मूळच्या नागपूरच्या आहेत. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे.