पुणे : शहरात अध्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ होत आहे. या अत्याचारांवर मात करण्यासाठी हडपसर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख या थेट रस्त्यावर उतरल्या आहेत. महिलांसंबंधित गुन्ह्यांवर रोख लावण्यासाठी त्यांनी पथदर्शी उपक्रम राबविला आहे. त्यांनी महिला सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी कामगार वस्तीवर भेट देऊन समस्या समजून घेऊन सुरक्षिततेचे धडे देण्यासाठी नागरिकांशी संवाद साधला आहे.
बुधवारी (दि १९) रोजी हडपसर विभागातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध भागातील महिलांशी व मुलींशी सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी संवाद साधला आहे. केशवनगर भागात ससाणे कॉलनी, भोई आली, रेणूका माता मंदीर, गायरण वस्ती या कामगार, मजुर वस्तीमधील महिलांना यावेळी त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्गदर्शन देखील केले आहे.

त्याचबरोबर महिला व मुलींसोबत कोणतेही गैरकृत्य अथवा अत्याचार होत असल्यास त्यांनी तात्काळ पोलीसांना माहिती द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. महिला अथवा मुलींवर जर कोणी अत्याचार किंवा गैरकृत्य केल्यास कडक कायदेशिर कारवाई करण्यात येईल असे देखील सांगण्यात आले आहे, तसेच महिलांना कायदेशिर कारवाई बाबत विश्वास यावेळी देण्यात आला आहे. मुलींना व महिलांना सोशल मिडीयाचा योग्य वापर करावा, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये याबाबत मार्गदर्शन केले आहे. यावेळी सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांनी कौटुंबिक कलह होवू नये यासाठी देखील मार्गदर्शन केले आहे.
यावेळी मुलींना गुड टच, बॅड टच, याबाबत माहिती दिली आहे. शालेय विद्यार्थी विद्याथ्यांकरीता पुणे शहर पोलीस दलाकडून सुरु करण्यात आलेल्या पोलीस काका, पोलीस दीदी, बडी कॉप, दमिनी पथक या उपक्रमाची माहिती देण्यात आली आहे.
या उपक्रमाद्वारे महिलांमध्ये आत्मविश्वास व सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.












