पिंपरी: मागच्या वर्षी नवरात्री उत्सवामध्ये झालेल्या भांडणाच्या कारणावरुन एका तरुणाला रस्त्यात अडवून त्याच्यावर लोखंडी रॉडने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पिंपरी पोलिसांनी याबाबत सुजल बनपट्टे (वय २०, रा. ओटा स्किम, निगडी), रोहित जाधव (वय २८) आणि अक्षय शिंदे (वय २६, दोघे रा. पिंपळे गुरव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नितीन नारायण शिंगाडे (वय ४३, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली आहे. पिंपरी येथील नेहरुनगरमधील संतोषी माता चौकात मंगळवारी रात्री ९ वाजता हा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात गेल्या वर्षी नवरात्रीमध्ये भांडणे झाली होती. फिर्यादी हे भोसरी येथून त्यांचे कामावरून घरी जात असताना संतोषी माता चौकातील सिग्नल लागल्याने ते थांबले होते. त्यावेळी सुजल बनपट्टे याने मोटार सायकल आडवी लावून फिर्यादीला अडविले. त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात वार केला. फिर्यादी हे पळून जात असताना रोहित जाधव याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीच्या कानामागे मारले. उजव्या पायाच्या घोट्याजवळ मारले. फिर्यादी हे खाली पडले असताना अक्षय शिंदे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले असल्याचा फिर्यादी यांनी नमूद केले आहे. पुढील तपस पिंपरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आटवे करीत आहेत.