पुणे प्रतिनिधी:
माजी खासदार संजय काकडे अडचणीत आले आहेत. महापालिकेने अनधिकृत बांधकामाबाबत त्यांना नोटीस बजावली आहे. भाजपा नेते संजय काकडे यांच्या कर्वेनगर येथील काकडे पॅलेस मंगल कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामाप्रकरणी महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाने नोटीस दिली आहे. हे बांधकाम येत्या ३० दिवसांत काढून घेण्यात यावे. अन्यखा महापालिकेकडून पाडण्यात येईल, असा थेट इशारा पालिकेने दिला आहे. काकडे पॅलेस मंगल कार्यालयाच्या बांधकामाबाबत माहिती अधिकारातून माहिती मागविण्यात आली होती. मात्र माहिती देण्यास पालिककेडून टाळाटाळ करण्यात येत होती. असा आरोप तक्रारदाराने केला होता. त्यानंतर पालिकेने याची दखल घेत कार्यालयाच्या बांधकामाची पाहणी केली. यात दुसऱ्या मजल्यावर विनापरवाना २५१ चौ. मी व तिसऱ्या मजल्यावरील ४२० चौ. मी. चे संपूर्ण बांधकाम अनाधिकृत असल्याचे पंचनाम्यात समोर आले आहे. याप्रकरणी 30 दिवसांत सदरील बेकायदेशीर बांधकाम काढून घ्यावे, अन्यथा हे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. त्यामुळे आता संजय काकडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.












