माढा : निवडणुकीचे वेध लागले की राजकीय पक्ष आणि नेत्यांमध्ये सत्तेची महत्त्वाकांक्षा जागृत होते. त्यातून दावे-प्रतिदावे केले जातात. मात्र स्थानिक परिस्थिती, मतदारांचा कानोसा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वरिष्ठांचा आदेश आला की सर्व निर्णय बदलावे लागतात. बीड येथील ओबीसी मेळाव्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले. आता मात्र जानकर हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या महादेव जानकर यांनी शिवसेना-भाजप सरकारमध्ये मंत्रिपद भूषवले होते. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना ते बहीण मानतात. मात्र नंतरच्या काळात जानकरांचे भाजप नेतृत्वाशी खटके उडू लागले आहेत. त्यामुळे त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना महायुती आणि महाविकास आघाडीपासून लांब राहत स्वतंत्रपणे लढण्याचे जाहीर केले.