पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.०२ : येरवडा परिसरात माथाडीच्या नावाने खंडणी मागणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. कल्याणीनगर मध्ये खंडणी विरोधी पथक-२ कडून ही कारवाई करण्यात आली आहे. विकी नारायण औरंगे (वय ३१ रा. गांधीनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि कल्याणीनगर मध्ये एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावर ऑफिसचे काम सुरू होते. ऑफिसच्या कामासाठी काही साहित्य टेम्पो मध्ये आणले होते. त्यावेळी आरोपीने येरवडा परिसरातील माथाडी कामगार असल्याचे सांगून १ लाख २० हजार रुपये खंडणीची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास काम करू देणार नसल्याचे सांगत जीवे मारण्याची धमकी दिली.
सदर आरोपी विरोधात फिर्यादीने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सदर आरोपी विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथक-२ चे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव व सह पोलीस कर्मचाऱ्यांनी सापळा रचून आरोपीला ८० हजार रुपयांची खंडणी स्विकारताना रंगेहात पकडले. आरोपी विरोधात भा.द.वि कलम ३८६, ३८७, ५०४ अन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (गुन्हे), सह पोलीस आयुक्त (गुन्हे -२) सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २ पोलिस अंमलदार प्रदीप शितोळे विनोद साळुंखे सुरेंद्र जगदाळे संग्राम शिनगारे विजय गुरव सौदोबा भोजराव शंकर संपते राहुल उत्तरकर अनिल मेंगडे चेतन आपटे प्रदीप गाडे यांनी केले आहे.












