पुणे प्रतिनिधी
पुणे : राज्यात मान्सून संपला आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान देशभरात कसा पाऊस झाला आहे, त्याची माहिती पुणे हवामान विभागाकडून जारी करण्यात आली. यंदा पावसाने सरासरी गाठली नाही. जून महिन्यात उशिराने पाऊस झाला. त्यानंतर जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला असताना ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाने दडी मारली.
यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण तयार झाले होते. सप्टेंबर महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे पिण्याची पाण्याची चिंता मिटली आहे. आता परतीच्या पावसावर राज्यातील धरणांमधील जलसाठा अवलंबून असणार आहे.
चार महिन्यांत कसा पडला पाऊस
हवामान विभागाने चार महिन्यांत देशभरात कसा पाऊस झाला आहे, त्याची माहिती जारी केली आहे. त्यानुसार जून आणि ऑगस्ट महिन्यात पावसाची मोठी तूट निर्माण झाली. परंतु जुलै आणि सप्टेंबर महिन्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. देशभरात जून महिन्यात १५१.१ मिमी म्हणजे सरासरीच्या केवळ ९१ टक्के पाऊस झाला. जुलै महिन्यात ३१५.९ मिमी पाऊस झाला. यामुळे या महिन्याची सरासरी ११३ टक्के झाली.
त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाने दडी मारली. चार महिन्यात सर्वात कमी पाऊस ऑगस्ट महिन्यात झाला. या महिन्यात १६२.७ मिमी म्हणजे सरासरीच्या केवळ ६४ टक्के पाऊस झाला. सप्टेंबर महिन्यात वरुण राजाची पुन्हा कृपी झाली. या महिन्यात १९० मिमी पाऊस झाला. या महिन्याची सरासरी ११३ टक्के आहे.












