मार्केटयार्ड येथील पुणे उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार्किंग केलेल्या गाड्यांना बाजार समितीकडून पार्किंग शुल्क आकारले जात आहे. मात्र बाजार समितीच्या ठेकेदारांकडून गाड्यांना बनावट पावत्या देऊन शुल्क वसूल केले जात आहे.
त्यामुळे बाजार समितीची सुरक्षा आणि अतिक्रमण विभागाचे पितळ उघडे पडले आहे. बाजार समितीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले होत आहेत. सोबतच हा प्रकार कोणाच्या आशीर्वादाने सुरु आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बनावट पावती क्र. ४८३९ या पावतीवर २८ मे रोजी गाडी क्र. एम.एच. १२ क्यू.आर ९३१६ या वाहन चालकाला नो पार्किंगच्या नावाखाली ३२० रुपये शुल्क वसुल केल्याचे समोर आले आहे तर १० सप्टेंबर २०२३ रोजी ४८३९ या ओरिजनल पावती क्रमांकाद्वारे मे सेजल ट्रेडिंग कंपनीने ४४ हजार १९ रुपयांचा सेस बाजार समितीकडे भरला आहे.
भुसार विभागातील फळे भाजीपाला विभागाच्या गेट क्र. ४ च्या परिसरात अवेरिया एंटरप्रायझेस या ठेकेदाराला ठरवून दिलेल्या जागेव्यतिरिक्त रहदारीच्या अर्ध्या रस्त्यावर ताबा मारत पार्किंग शुल्क वसुली सुरू केल्याचा प्रकार समोर आला होता.
तसेच यापूर्वीही एनेकवेळा पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान ठेकेदाराचे कर्मचारी वाहनांमध्ये झोपलेल्या चालकांना उठवून दमदाटी करत पैसे वसूल करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.