मावळ: मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा समन्वय मेळावा सोमवारी (८ एप्रिल) काळेवाडी येथे पार पडला. कोणत्याही परिस्थितीत मावळमधून महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे. गेल्यावेळी पेक्षा जास्त मताधिक्य मिळाले पाहिजे. आपला विरोधी उमेदवार संजोग वाघेरे यांच्याशी अनेक वर्षाचे संबंध आहेत. परंतु, निवडणुकीची प्रचार यंत्रणा सुरू झाल्यावर काही गोष्टी पाळाव्या लागतात. १३ तारखेचे मतदान होईपर्यंत विरोधी उमेदवाराला भेटायला जाऊ नका, गप्पा-टप्पा मारायला जाऊ नका, निवडणूक काळापर्यंत नातेसंबंध बाजूला ठेवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केले. वाघेरे सांगत आहेत की, मीच त्यांना तिकडे पाठवले, लढायला लावले. हे सगळे खोटे असून अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, सुनील शेळके, उमा खापरे, आठवले गटाच्या चंद्रकांता सोनकांबळे यावेळी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, काळ बदलला आहे. आता विकासाच्या राजकारणावर भर दिला पाहिजे. विकासाची वज्रमूठ बांधली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांच्या हाती देश सुरक्षित आहे. जगाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर आणायची आहे. त्यासाठी तिसऱ्यांदा मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. विकास कामे मतदारपर्यंत पोहोचवावीत. दहा वर्षांत जगाची मोठी प्रगती झाली आहे. याला गॅरंटी म्हणतात. पक्षाला, उमेदवारी मिळाली नाही म्हणून असंतुष्ट राहू नये, विरोधी पक्षाकडे पंतप्रधान पदासाठी चेहरा नाही. ही निवडणूक विचारांची नव्हे विकासाची आहे. प्रत्यक्षात कृतीत येऊ शकत नाहीत, अशी आश्वसने विरोधकांनी दिली आहेत.
महिलेच्या खात्यात एक लाख रुपये टाकायचे हे दिलेले आश्वसन शक्य आहे का, ही निवडणूक तरुणांचे भवितव्य ठरवणारी आहे. विरोधकाकडे कोणताही मुद्दा नाही. संविधान बचाव, देश बचाव असे मोर्चे काढले जात आहेत. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत कोणीही संविधान बदलू शकत नाही. काहीजण म्हणतात यापुढे निवडणूक होणार नाही. ही शेवटची निवडणूक, येथून पुढे हुकूमशाही येणार, असे मते मिळविण्यासाठी काहीही बोलतात. एवढ्या मोठ्या देशात निवडणूक न होणे हे शक्य आहे का?, असेही पवार म्हणाले.