मावळ: मावळ येथील ८०० फुट उंचीच्या नागफणी कड्यावरून, अजितदादा पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत व मावळचे आमदार सुनिल शेळके यांना मंत्रीमंडळात स्थान मिळावे अशा आशयाचा तीस फुटाचा मोठा बॅनर झळकावून अनोख्या पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकालात महायुतीला बहुमत मिळालं आहे. अशातच मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, अशी चर्चा राज्यभर रंगली आहे. दरम्यान अजितदादा भावी मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यातील लोणावळा लगतच्या अतिशय दुर्गम व कठीण नागफणी कडा हा घनदाट जंगलातील खड्या कातळ खडकाचा, चढाईला आहे. असा हा कठीण असलेला ड्युक्स नोज उर्फ नागफणी कडा. गिर्यारोहणाचा अनुभव आणि सुरक्षित साधनांच्या साह्याशिवाय या सुळक्यावरील चढाई अवघड मानली जाते, परंतु हा अवघड सुळका सर करून विकासाची दूरदृष्टी असलेल्या नेत्यांना मानाचे स्थान मिळावे हे ध्येय उराशी बाळगून जिद्द आणि धाडसाच्या जोरावर या युवा गिर्यारोहकांनी नागफणी सुळक्यावर बॅनर झळकावला आहे.
आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत गिर्यारोहकांना खुणावणारे अनेक सुळके आपण पाहतो. या अवघड सुळक्यांवर गिर्यारोहक निसर्गाशी सामना करीत यशस्वीरीत्या चढाई करतात. अशाच सुमारे ८०० फूट उंचीच्या नागफणी सुळक्यावर मावळातील तरुणांनी यशस्वीरित्या चढाई करून वाऱ्याच्या वेगाचा सामना करीत ३० फुटी मोठा बॅनर झळकावला आहे. या मोहिमेत मावळातील नारायण मालपोटे, नितीन पिंगळे, विशाल गोपाळे, अजित गोपाळे व पांडुरंग जाचक यांनी सहभाग घेतला होता.