मावळ : करुंज ग्रामपंचायतच्या महिला सदस्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात दोघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच स्मशानभूमी आणि दलित वस्तीकडे जाणारा रस्ता खोदल्याने शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
कल्पना कांबळे असे जातीवाचक शिवीगाळ करण्यात आलेल्या महिला ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. याप्रकरणी साईदास पवार, अविनाश लगड यांच्यावर कामशेत पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. मावळ करुंज गावामध्ये नागरिकांनी स्मशानभूमी आणि दलित वस्तीकडे जाणारा रस्ता जेसीबीच्या साह्याने खोदला. रस्ता बंद झाल्याने ग्रामपंचायत सदस्य कल्पना कांबळे यांनी याचा जाब विचारला. त्यानंतर त्यांना शिवीगाळ करण्यात आली.
दरम्यान, या रस्त्याच्या बाजूला रस्त्यावर धुणीभांडी केली जात असल्याने त्याचे पाणी कच्चा रस्त्यावर येते. त्यामुळे रस्त्यावर चिखल होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. दलित वस्ती किंवा गावात एखाद्याचा मृत्यू झाला तर स्मशानभूमीकडे जाणारा कोणताही रस्ता नाही. त्यामुळे हा रस्ता काँक्रीटचा करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतने ठराव पास केला आहे. ही जागा माझी आहे त्यामुळे मी जागा देणार नाही असे सुभाष लगड यांनी सांगितले.
या जागेबाबत प्रशासकीय दरबारी अर्ज केल्यानंतर तलाठ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
तलाठ्यांसमोरच साईदास पवार, अविनाश लगड यांनी अश्लील शिवीगाळ केली. याप्रकरणी दोघांविरोधात कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील संशयितांना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली.