पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.०९ : मध्यरात्री शिकारीसाठी आलेल्या बिबट्याची चाल सीसीटीव्हीत कैद झाली आहे. शनिवारच्या मध्यरात्री सांगवडे येथील विनायक जगतापांच्या अंगणात बिबट्याने दहशत माजवली.
जगतापांचं पाळीव कुत्रं घराबाहेरच रक्षणासाठी बसलं होतं त्यावेळी दबक्या पावलात बिबट्या तिथं पोहचला आणि काही कळायच्या आतच त्याने कुत्र्याची शिकार केली. याआधीही बिबट्याने या परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांचे अनेक पाळीव जनावरांना आपला शिकार बनवला आहे.
गावात पुन्हा बिबट्याचा वावर वाढलाय, हे या दृश्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. सोबतच स्थानिक नागरिक दहशतीत आहेत, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना केली आहे.
सांगवडे गावात दरवर्षी या कालावधीत बिबट्याचा वावर असतोच. त्यामुळे वन विभागाच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याच्या तसेच खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर जाऊ नये. परिसरात फटाके फोडून आवाज करावा. बिबट्या आढळल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
सांगवडे येथे आढळलेला बिबट्या जखमी आहे. त्याच्या उजव्या पायाला इजा झाली असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांनी सांगितले. मात्र या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा बसवावं अशी हळहळ ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.












