पिंपरी – चिंचवड: मोबाईल फोन फोडल्याच्या कारणावरुन मित्राच्या डोक्यात लोखंडी तव्याने मारुन तसेच फेट्याने गळा दाबून खून केल्याची घटना महाळुंगे इंगळे गावच्या हद्दीत २८ मार्च रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने मध्य प्रदेशातून अटक केली आहे. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामसिंग सुलतानसिंग गोंड (वय ३०, रा. रेयाना ता. जि. दमोह, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कालू मंगल रकेवार (वय २३, रा.महाळुंगे, ता. खेड. मूळ रा. पथरीया, ता. जि. दमुही, मध्यप्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कालू याचा भाऊ पप्पू मंगल रकेवार यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने गुन्ह्याचा तपास करताना घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही चेक केले. तसेच चाकण बस स्टँड, महाळुंगे परिसरात व पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आरोपीचा शोध घेतला. आरोपीने मोबाईल बंद केल्यामुळे तांत्रिक अडचणी येत होत्या. पोलिसांनी आरोपी काम करत असलेल्या कंपनीत तपास केला. सखोल चौकशी करत असताना पोलीस अंमलदार हनमंते, बाळसराफ जैनक, मेरगळ यांच्या पथकाने आरोपीची माहिती प्राप्त केली. आरोपी मुळ गावी आला असल्याची माहिती मिळताच पथक मध्य प्रदेशातील आरोपीच्या गावी पोहोचले. पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेत असताना आरोपीला पोलीस आल्याची चाहूल लागली. आरोपी पळून जात असताना त्याला शिताफिने ताब्यात घेतले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी,
पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. विशाल हिरे
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस अंमलदार यदु आढारी, सचिन मोरे, विठ्ठल सानप, ऋषिकेश भोसुरे, सागर जैनक, राजकुमार हणमंते, रामदास मेरगळ, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, राहुल सूर्यवंशी, सुधीर दांगट, समीर काळे, शशिकांत नांगरे, महेश भालचिम यांच्या पथकाने केली.