पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २८ : मुंबईत आपलं स्वतःचं घर असावं असं प्रत्येक नागरिकाचे स्वप्न पण आता मुंबईमध्ये मराठी माणसाला घर नाकारल्याचा प्रकार समोर आला ही घटना आहे मुंबईमधील मुलुंड या भागातील.
तृप्ती देवरुखकर या त्यांच्या पती समवेत मुलुंड वेस्ट येथे शिवसदन सोसायटी मध्ये ऑफिस साठी जागा पाहण्यास गेल्या मात्र तेथील गुजराती सेक्रेटरीने येथे मराठी माणसांना घर देणार नाही असे त्यांच्याकडे नियमावली मागितली असता पोलिसांना सांगा नाहीतर आणखी कोणाला सांगा असे म्हणत तृप्ती यांच्या पतीला धक्काबुक्की केली. तसेच ही घटना मोबाईलवर शूट करत असल्यामुळे त्यांचा मोबाईल देखील काढून घेण्यात आला.
पीडित महिलेने सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर मनसेने या प्रकरणाची दखल घेतली मनसेने सोसायटीतील संबंधित व्यक्तींना आणि पदाधिकाऱ्यांना माफी मागायला लावली असून पुन्हा असं काही करणार नाही हे देखील वदवून घेतले आहे.
तृप्ती देवरुखकर यांच्या घटनेची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली असून याप्रकरणी सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांना चौकशी करून अहवाल मागवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे याप्रकरणी संबंधित महिलेला भाषेच्या आधारे दुय्यम वागणूक देऊन मारहाण करण्यात आल्याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबत माहिती दिली.












