पुणे प्रतिनिधी
पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. एक्स्प्रेस वेवरती मोठे दिशादर्शक फलक बसवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरती आज (10 ऑक्टोबर) दुपारी 12 ते 2 या वेळात पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.
दरम्यान जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून हलक्या वाहनासाठी शिंग्रोबा घाटातील वाहतूक सुरु असणार आहे. आयटीएमएस प्रणालीच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. एमएसआरडीसीने याबाबतची माहिती दिली आहे.
एमएसआरडीसीच्या माहितीनुसार, अमृतांजन पुलाच्या अलीकडे आणि पलीकडे म्हणजे किलोमीटर ४५ आणि ४५.८०० किलोमीटरवर ओव्हरहेड गॅन्ट्री बसवली जाणार आहे. या कामावेळी पुण्याकडे येणारी अवजड वाहतूक खालापूर टोल नाक्यावर थांबवली जाणार आहे. तर हलकी वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडे वळवण्यात येणार आहे.
मुंबईहून पुण्याला जाणारी वाहतूक २ तासांसाठी बंद असली, तरी पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरू असणार आहे. फक्त कारसाठी जुना पुणे – मुंबई महामार्ग शिंग्रोबा घाटातील सुरू राहील, अशी माहिती देण्यात आली आहे.












