पिंपरी- महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) आदेशानुसार, पुणे शहरातील दोन तर पिंपरी-चिंचवड शहरातील १३ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या रद्द झाल्या आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या इतर ठिकाणी बदल्या केल्या होत्या. त्यातील काही पोलिस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) मध्ये धाव घेतली होती. त्यावर, ‘मॅट’ने राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांना बदली आदेशाची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार, निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित घटक प्रमुखांची बैठक घेतली. त्यानंतर, पुणे शहर (२), पिंपरी-चिंचवड (१३), ठाणे शहर (७), विशेष पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र (१) अशा एकूण २३ पोलिस निरीक्षक २१ डिसेंबर २०२३ रोजी संबंधित घटकात कार्यकारी पदावर कार्यरत होते. त्यांना आयोगाच्या निकषाप्रमाणे जिल्ह्याबाहेर बदली करण्यापासून सवलत असल्याचे निवडणूक कार्यालयाकडून कळविले आहे. तसेच महासंचालक कार्यालयाकडूनही ४२ पोलिस निरीक्षकांच्या बदलीबाबतची पडताळणी केली. त्यानंतर, एकूण ६५ पोलिस निरीक्षकांची बदली रद्द करण्याचे आदेश अपर पोलिस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल यांनी दिले आहेत.
बदली रद्द झालेले पोलिस निरीक्षकांची नवे : शंकर डामसे, शैलेश गायकवाड, शंकर बाबर, ज्ञानेश्वर साबळे, दीपाली धाडगे, प्रसाद गोकुळे, सुनील पिंजण, विश्वजित खुळे, बाळकृष्ण सावंत, दीपक साळुंखे, शहाजी पवार, अरविंद पवार, अनिल देवडे (सर्व पिंपरी-चिंचवड), विनायक वेताळ, राजू चव्हाण (पुणे).