पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ११ : फरासखाना वाहतूक विभागा अंतर्गत महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. [ पुणे मेट्रो ] यांच्या वतीने पुणे मेट्रोचे काम सुरु करण्यात आले आहे.मेट्रोच्या कामा अंतर्गत साततोटी पोलीस चौकी,कसबा पेठ पासून ते बुधवार पेठ मेट्रो स्टेशन पर्यंत पादचारी मार्ग करण्यात येणार आहे.त्यामुळे पवळे चौक ते कमला नेहरू चौक [ अगरवाला रोड ] या परिसरात वाहतुकीमध्ये बदल करणे गरजेचे आहे.
वाहतुकीमध्ये बदल करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र.एम. व्ही. ए.०१९६ / ८७१ / सीआर- ३७ / टीआरए-२ दिनांक २७/०९/१९९६ च्या नोटीफिकेशन नुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६( १ ) (ए) (बी). | ११६ (४) आणि ११७ अंतर्गत विजयकुमार मगर,पोलीस उपआयुक्त,वाहतूक,पुणे शहर यांनी फरासखाना वाहतूक विभागा तर्फे अगरवाल रोडवरील वाहतुकी मध्ये बदल करण्याचे आदेश दिले आहेत.
पवळे चौक ते कमला नेहरू चौक [ अगरवाला रोड ] येथील तीन चाकी, चार चाकी व जड वाहनांची वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली असून ती वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे.पवळे चौकातून अगरवाल रोडने कमला नेहरू हॉस्पिटल कडे जाणाऱ्यांनी पवळे चौकातून पुण्यश्वर रोडने कुंभारवेस चौक मार्गाने कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालय येथून उजवीकडे वळून बाबुराव आव्हाड पथ रोडने पुढे जावे. तसेच पवळे चौकातून दगडी पाल रोडने माणिक चौक मार्गे फडके हौद चौक,गणेश रोडने पुढे जावे.
कमला नेहरू हॉस्पिटल चौकातून अगरवाल रोडने पवळे चौकाकडे जाणाऱ्यांनी कमला नेहरू चौकातून डावीकडे वळून महाराणा प्रताप रोडने देवजी बाबा चौकातून गणेश रोडने पुढे जावे.तसेच कमला नेहरू चौकातून उजवीकडे वळून बाबुराव आव्हाड पथ मार्गाने कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालय येथून डावीकडे वळून कुंभारवेस मार्गे वीर संताजी घोरपडे रोडने पुढे जावे.
असे फरासखाना विभागा अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपातील वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.












