मोक्का कारवाई करण्यात आल्यानंतर आठ महिने फरार असलेल्या दोन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई कोंढवा येथील तालाब चौकात करण्यात आली आहे. जावेद बद्रेआलम शेख (वय-२१ रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर, आंबेगाव बु.,), सुरज नंदु बांदल (वय-१९ सध्या रा. शनिनगर, आबंगाव बु., पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या भा.दं.वि.कलम ३०७, ३८५, ३२४, ४५२, १४३, १४४, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६(२) सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट, आर्म अॅक्ट, या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा (मोक्का) अंतर्भाव करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आरोपी मागील आठ महिन्यापासून फरार होते.
आरोपी अस्तीत्व लपवुन वारंवार वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांची ओळख व ठाव ठिकाणा बदलून वास्तव्य करीत होते. त्यामुळे पोलीस त्यांना पकडण्यासाठी गेल्यानंतर आरोपी पळून जात होते. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार चेतन गोरे यांना आरोपींचा चालु मोबाईल नंबर व सोशल मीडियाची माहिती मिळाली. त्यानुसार तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी कोंढवा येथील तालाब चौकात असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याठिकाणी सापळा रचून ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी आरोपींना तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नंदीनी वग्याणी यांच्या ताब्यात दिले आहे.