पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.२४ : देशातील अनेक पक्षातील विरोधक भाजपच्या पराभवासाठी एकजूट होत आहेत. त्या एकत्रीकरणाला इंडिया असे नाव देण्यात आले आहे. या इंडियाला पाठींबा देण्यासाठी पुण्यात विविध समाजवादी नेते एकाच मंचावर एकत्र आले आहेत. समाजवादी जनता परिवार बैठकीत पंतप्रधान नरेंद मोदी आणि अमित शहा यांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
यावेळी जेष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, डॉ. कुमार सप्तर्षी, पन्नालाल सुराणा, शब्बीर अन्सारी, माजी आमदार गंगाधर पटने, काळूराम धोदडे, सुभाष लोमटे, सुभाष वारे, सोमनाथ रोडे, शशांक राव, शान-ए-हिंद, शिवाजी शिंदे, अजमल खान, हसन देसाई, अरुण म्हात्रे, सभांजी भगत, अभिजित वैद्य आदी उपस्थित होते. आमदार कपिल पाटील यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. पुण्यातील एस.एम.जोशी सभागृहात हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
देशाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. देशातील विषमता वाढत आहे. बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तरुण-तरुणी नोकरी मिळावी या हेतूने धडपड करत आहेत. असे असताना सरकार अजूनही शांतच आहे. सरकारची निर्णय घेण्याची प्रक्रिया, कायदे करण्याच्या प्रक्रियेतून अल्पसंख्याक व्यक्तींना बाजूला सारायचे यातून देशात फूट पडण्याची शक्यता आहे.
या विरुद्ध आपण उभे राहायला हवे. या वृत्तीचा पराभव होण्यासाठी आपण एकजुटीने काम केलं पाहिजे. महिलांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. महिलांना आपण या प्रवाहात आणलं तरच अजून संधी उपलब्ध होतील. समाजवादीने एकजूटीने काम करून येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत भाजपा सरकारचा पराभव केला पाहिजे असे मत पन्नालाल सुरणा यांनी व्यक्त केले.












