पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०७ : एका नामांकित कंपनीतून संचालक बोलत असल्याचे सांगून एका व्यक्तीची तब्ब्ल सहासष्ट लाख एक्केचाळीस हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. या प्रकरणी एकाला बिहार मधून अटक करण्यात आले आहे.
बिशाल कुमार भरत मांझी वय २१ रा. (लकरी दरगाह,सिटी सिवान, राज्य बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्ह्यात वापरलेले मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, बँक खाते, पेयमेन्ट लिंकसचा तांत्रिक सहाय्याने तपास करत सायबर पोलिसांनी आरोपीवर कारवाई केली आहे. सदर आरोपींकडून एक रेडमी-०९ कंपनीचा मोबाईल व सहा वेगवेगळे सिमकार्ड जप्त करण्यात आले आहे. ११ सप्टेंबर पर्यंत आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि फिर्यादी हे एका नामांकित कंपनीत अकाऊंट विभागात काम करत असून आरोपीने फिर्यादी यांच्या मोबाईल नंबरवर मॅसेज व संपर्क करून इन्फिनिटी डेवलपर्स प्रा.लि. कंपनीचे संचालक बोलत असल्याचे भासवून आरोपीने तीन वेगवेगळ्या बँक खात्याची लिंक पाठवून सहासष्ट लाख एक्केचाळीस हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.
आरोपी विरोधात भा.द.वि.कलम ४१९,४२०, ३४ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ सी, ६६ डी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत करीत आहेत.
सदरची कामगिरी सदरचा तपास पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहायुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त आर्थिक व सायबर (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सह पोलीस आयुक्त आर एन राजे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे पाटील, पोलीस निरीक्षक प्रमोद खरात, पोलीस अंमलदार वैभव माने, अश्विन कुमकर, शिरीष गावडे, प्रवीण राजपूत, राजेश केदारी, दत्तात्रेय फुलसुंदर यांनी केले आहे.












