विवाहित महिलेच्या मोबाईलवर ओटीपी पाठवून मोबाईल हॅक केला. त्यानंतर मोबाईल मधील महिलेचे फोटो एडिटींग करुन अश्लिल व्हिडिओ तयार करुन व्हायरल केला. विनयभंग केल्या प्रकरणी येरवडा पोलिसांनी दोन मोबाईल धारकांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २ फेब्रुवारी सकाळी दहा ते ८ फेब्रुवारी रात्री बारा दरम्यान घडला आहे.
याबाबत संगमवाडी, येरवडा येथे राहणाऱ्या २२ वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन ९०२८१XXXXX व ९३२५८XXXXX मोबाईल धारकांवर आयपीसी ३५४, ३५४अ, ५०० सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर ओटीपी पाठवून मोबाईल हॅक केला. त्यानंतर मोबाईलमधील फोटो गॅलरीत असलेल्या फोटोंचा वापर करुन अश्लिल फोटोवर महिलेचा चेहरा लावला. आरोपींनी महिलेचे फोटो एडिटींग करुन अश्लिल व्हिडिओ तयार केला. तयार केलेला महिलेचा अश्लिल व्हिडिओ तिच्या पतीच्या व्हॉट्सअॅप वर पाठवला. तसेच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन महिलेच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे आशालता खापरे करीत आहेत.