यवतमाळ : पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यातील कोअर झोनमध्ये नियम तोडून वाघासोबत सेल्फी घेणे एका वनक्षेत्र अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले. या घटनेची दखल घेत आरएफओ विवेक येवतकर यांना निलंबित करण्यात आले. टिपेश्वरमध्ये २५ च्या वर वाघांचे अस्तित्व असल्याने हे अभयारण्य वन्यजीव प्रेमींसाठी हक्काचे पर्यटनस्थळ झाले आहे. येथे हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने पर्यटकांची सतत वर्दळ असते. पर्यटकांनी बेजबाबदारपणे वागू नये याची जबाबदारी असणाऱ्या एका आरएफओने टिपेश्वरच्या कोअर फॉरेस्टमध्ये असा काही प्रताप केला की, वन विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेत या वनक्षेत्र अधिकाऱ्याला थेट निलंबित केले.
टिपेश्वर अभयारण्यातील माथणी गेटवर कर्तव्यावर असलेले आरएफओ विवेक येवतकर यांनी वन्यजीव अधिनियमांना पायदळी तुडवत अभयारण्यातील कोअर झोनमध्ये स्वत:च्या खासगी वाहनाने प्रवेश केला. रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारस ते कार (क्र. एमएच २७, बीवाय ६०६२) ने कोअर झोनमध्ये गेले. त्यावेळी अनेक पर्यटकांच्या जिप्सीसुद्धा तेथे पोहोचल्या होत्या.
कोअर झोनध्ये खासगी वाहन नेण्यास बंदी असतानाही येवतकर हे आपले वाहन घेवून तेथे गेले होते. याशिवाय कोअर जंगलात वाहनाखाली उतरण्यास परवानगी नसताना, येवतकर यांनी वाहनाखाली उतरून फोटो शुटही केले. येथील ज्या पानवठ्याजवळ आदल्याच दिवशी दोन वाघांची झुंज झाली होती, त्याच ठिकाणी येवतकर यांनी काही अंतरावर उभ्या असलेल्या वाघासोबत सेल्फी काढला. हा सर्व प्रकार तेथे उपस्थित पर्यटकांनीही बघितला. काहींनी याचे व्हिडीओ चित्रिकरणही केले. या प्रकाराची गंभीर दखल घेत वन विभागाने वनक्षेत्र अधिकारी विवेक येतवकर यांना तडकाफडकी निलंबित केले. हा प्रकार उजेडात आल्यानंतर विवेक येवतकर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. तो मंजूर झाला असून येवतकर यांना निलंबित करण्यात आले, अशी माहिती टिपेश्वर अभयारण्याचे विभागीय वन अधिकारी उत्तम फड यांनी दिली.