पुणे | प्रतिनिधी
राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामध्ये हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत डॉ. सदानंद मोरे यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. यामुळे राजकीय आणि साहित्य विश्वात चर्चांना उधाण आले आहे.
राज्याच्या ‘साहित्य आणि संस्कृती मंडळा’चे रूपांतर संचालनालयात करण्याचा प्रस्ताव मराठी भाषा विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सादर केल्याने डॉ. सदानंद मोरे यांच्यासह त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या मंडळाने राजीनामा दिला आहे. मात्र, संचालनालयाच्या प्रस्तावावर चर्चा झाली नसून, मंडळाच्या सदस्यांचा राजीनामा स्वीकारला नसल्याची स्पष्टोक्ती मराठी भाषा मंत्री डॉ. दीपक केसरकर यांनी दिली.
मंडळाच्या नव्या रचनेमुळे मंडळाचे प्राण आणि स्वायत्तता नष्ट करण्याचे काम नोकरशाही करीत आहे. मंडळातील चांगल्या लोकांना बाजूला सारून नोकरशाहीच्या दिमतीला संस्था बांधण्याचे काम सुरू आहे. या प्रकाराचा निषेध म्हणून संपूर्ण मंडळाने ठराव करून राजीनामापत्र सरकारला पाठवले आहे. भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, यातून फार काही साध्य होणार नाही.
– डॉ. सदानंद मोरे, अध्यक्ष, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ












