पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.०४ : येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडून मोबाईल फोन वापरण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यात वाढ होताना दिसत आहे, कारण कारागृह अधिकाऱ्यांनी कैद्यांकडून आणखी तीन मोबाईल फोन जप्त केले आहेत. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस तक्रारीनुसार, येरवडा कारागृह अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून निरंजन उर्फ निलेश बाळू शिंदे, महेश राजू पंचारिया आणि आणखी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुरुंग अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार निलेश शिंदे यांने कारागृहात एका बॅगेत लपवून ठेवलेला मोबाईल, बॅटरी आणि सिमकार्ड सापडले.
येरवडा मध्यवर्ती कारागृहातून मोबाईल फोन सापडण्याची ही पहिली घटना नाही, कारण यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या काही महिन्यात घटनांचे प्रमाण वाढले असून प्रत्येक वेळी मोबाईल सापडल्यानंतर कैद्यांवर ताज्या केसेस दाखल होत आहेत.












