येरवडा परिसरात गुंडांनी कोयते उगारुन तब्बल १२ वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा प्रकार रामनगर परिसरातील भोर आळी येथे सोमवारी (दि.२६) रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याबाबत संतोष गोपाल चव्हाण (वय-४२ रा. तारकेश्वर मंडळ, भोर आळी, रामनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अजय चित्रगुप्त वाघरी (वय-१९ रा. सादलबाब चौक, येरवडा, पुणे), सुमित भारत सितापराव (रा. १९ रा. शिवनेरी बिल्डींग, खराडी) यांच्यावर भा.दं.वि. कलम ३०८, ४२७, ५०४, ५०६(2), ३४ सह आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनगर परिसरात सोमवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास दोघे जण आले. त्यांच्या हातात कोयता आणि हॉकी स्टिक होती. परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करुन रस्त्याच्या कडेला लावलेल्या मोटार, रिक्षा, टेम्पो, दुचाकींची अशा एकूण १२ वाहनांची तोडफोड करुन नुकसान केले. तसेच आरडाओरडा करुन जमलेल्या लोकांकडे हत्यारे दाखवून ‘जर कोणी समोर आले तर त्याला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील, गुन्हे निरीक्षक आशालता खापरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कदम करीत आहेत.