पुणे प्रतिनिधी
पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे मंगळवारी (दि. 1) आदर्श संयोजक पुरस्कार वितरण समारंभ आणि मराठी गझल मुशायरा आयोजित करण्यात आला आहे.सांस्कृतिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीस संस्थेतर्फे दरवर्षी आदर्श संयोजक पुरस्कार दिला जातो.
या पुरस्कासाठी यंदा ब्रह्मकमळ समूह, मुंबई या संस्थेचे संस्थापक विशाल राजगुरू यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कार वितरण प्रसिद्ध गझलकार, कवी वैभव जोशी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी दिली.
कार्यक्रम दि. 1 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात मराठी गझल मुशायरा आयोजित करण्यात आला असून यात प्रमोद खराडे, सूरज येलगुडे, वैभव कुलकर्णी, विजय उतेकर, आनंद पेंढारकर, सानिका दशसहस्त्र, सुनिती लिमये, आदेश कोळेकर यांचा सहभाग असणार आहे, असे संस्थेच्या कार्याध्यक्ष मैथिली आडकर यांनी सांगितले.












