पुणे: निवडणूक आयोगासह सर्व केंद्रीय यंत्रणा सरकारच्या ओझ्याखाली दबल्या गेल्या आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुदतीत सरकार स्थापन झाले नाही तर राष्ट्रपती राजवट लावली जाईल, असे सांगण्यात आले होते. मुदत उलटली तरी राष्ट्रपती राजवट लागू केली नाही. निवडणुकासुद्धा हायजॅक केल्या जात आहे, अशी टीका पुणे येथील काँग्रेसचे नेते व माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी केली.
लोकशाहीच्या रक्षणासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी सुरु केलेल्या आत्मक्लेष आंदोलनाला रविंद्र धंगेकर यांनी आज (दि. ३० नोव्हाम्बर) रोजी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे भेट देवून पाठिंबा दर्शवला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते.
रविंद्र धंगेकर म्हणाले, निवडणूक यंत्रणा हाताशी धरून लोकशाहीची झालेली चिरफाड संपूर्ण महाराष्ट्राने विधानसभा निवडणुकीत अनुभवली आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या सर्वांना संघर्षाचे आवाहन करत ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेष उपोषण सुरू केले आहे. उपोषण स्थळी त्यांची भेट घेवून यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. माझ्यासह संविधानावर श्रद्धा असलेला, लोकशाहीवर विश्वास असलेला प्रत्येक नागरिक या आंदोलनात सहभागी आहे.
गेल्या १० वर्षांत लोकशाहीला घातक वातावरण देशात निर्माण झाले आहे. हुकुमशाही लादली जात आहे. वैयक्तिक हल्ले, जातीयवादी आणि विषारी प्रचार केला जात आहे. जे ऐकत नाहीत त्यांना इडीच्या धमक्या दिल्या जात आहेत. वैभवशाली भारताची लोकशाही संपवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने लोकशाहीच्या बाजूने उभे राहणे आवश्यक आहे, असे रविंद्र धंगेकर यांनी सांगितले.