पिंपरी : ग.दि माडगूळकर यांच्या शब्दांना सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या अजरामर गीतरामायणावर भरतनाट्यम् नृत्याच्या माध्यमातून सादर केलेल्या कलाकृतिस रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ८ नृत्यांगनांनी रामायणातील विविध पात्रे भरतनाट्यम् नृत्य शैलीच्या माध्यमातून जीवंत करीत केलेल्या सादरीकरणास रसिकांनी टाळ्यांची दाद दिली.
गदिमा व्यासपीठ आणि सौदामिनी प्रॉडक्शन्स यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी येथील ग.दि माडगूळकर नाट्यगृह येथे आयोजित केलेल्या गीतरामायण भरतनाट्यम् नृत्य यांचा अनोखा संगम रसिकांनी अनुभवला.
सौदामिनी प्रॉडक्शन्स च्या ह्या १५ व्या प्रयोगास लेखक आनंद माडगूळकर, उद्योजक जितेंद्र पेठकर, कुमुदिनी पेठकर, दीपक येखे,संदीप सावंत, अविनाश मोरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस: अनूप मोरे, प्रदेश सचिव तेजस्विनी कदम, राजेश गाडगीळ, माजी नगरसेविका गीता आफळे, गदिमा व्यासपीठाच्या संचालिका हर्षदा माडगूळकर, सौदामिनी प्रॉडक्शन्स च्या संचालिका कल्पना बालाजी व अमिता गोडबोले, नृत्य दिग्दर्शिका गुरू सौदामिनी राव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आनंद माडगूळकर म्हणाले कि, गीतरामायण हि कलाकृती आजही ७० वर्षापासून कलाकारांच्या कल्पना शक्तीने वेगवेगळ्या पध्दतीने सादरीकरण होताना दिसत आहे. या गीतरामायणावर शेकडो शाळकरी विद्यार्थी नृत्य सादर करतात हेच यश आहे. हि एक सांस्कृतिक लाट आहे. आम्ही गदिमा व्यासपीठाच्या माध्यमातून वेगेवेगळ्या कलाकारांना संधी उपलब्ध करून देत आहोत.असे ते शेवटी म्हणाले.
यावेळी नृत्यांगना कल्पना बालाजी, मृगाक्षी देशमुख, इन्द्रजा गानू, शर्वरी गडकरी, निहारिका डिंगरे, गार्गी जोग, सुरभी सप्रे आणि अमिता गोडबोले यांनी गीतरामायणातील गाण्यावर नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ज्योती ब्रह्मे यांनी मानले.