पुणे, दि ९ : पिंपरी चिंचवड महापालिकेने परिसरातील आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी विशेष पथके नेमली आहेत. ही विशेष पथके पावसाळ्यात आठवड्यातील सर्व दिवस तैनात करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीसीएमसीचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी चिखली सोनवणे वस्ती रस्ता, तळवडे रुपीनगर मुख्य रस्ता, टॉवर लाईन रोड, चिखली गाव रस्ता, चिखली मोरेवस्ती येथील वाघू साने चौक ते चिंच माळा रस्ता, मुकाई चौक ते किवळे गाव, पुनवळे अंडरपास ते गायकवाड नगर आणि कोयते वस्ती रस्ते या रस्त्यांची पाहणी केली. त्यानंतर पाहणी करताना रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या तसेच पावसाळ्यानंतर ते डांबर किंवा कोल्ड मिक्सने बुजवावेत, असे निर्देश दिले.
शहर अभियंता ज्ञानदेव जुंधरे, कार्यकारी अभियंता अनिल शिंदे, देवण्णा गट्टूवार, उपअभियंता शालिग्राम अंदुरे उपस्थित होते.
महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये विशेष पथकांमार्फत खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. नागरिकांकडून तक्रार येताच खड्डे बुजविण्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे यांनी दिली आहे.
रस्ते दुरुस्तीच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेचे विशेष पथक सज्ज












