पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०३ : गोवा महामार्ग आणि कोकणच्या विकासासाठी कोकणातील पत्रकार आणि जनता ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी बोंबाबोंब आंदोलन करणार आहे. राजकारण्यांना १०,००० इतके एस.एम.एस पाठवण्यात येणार असून झोपलेल्या राजकारण्यांना जागे करण्यासाठी पत्रकार आणि जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी सांगितले आहे.
९ ऑगस्ट रोजी गोव्यातील पत्रकार आणि जनता रस्त्यावर उतरणार असून रायगड जिल्ह्यातील वाकण फाटा येथे बोंबाबोंब आंदोलनाची सुरुवात होणार आहे. या दिवशीचा आणखी एक उपक्रम म्हणजे मुख्यमंत्री बांधकाम मंत्री आणि सत्तेत असलेल्या रायगडच्या दोन्ही खासदारांना एकाच दिवशी किमान १०,००० एस.एम.एस पाठवले जाणार आहेत. हे सारे एस.एम.एस एकाच दिवशी पाठवण्यात यावे अशी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री. एस. एम. देशमुख यांनी विनंती केली आहे.
या आयोजित बोंबाबोंब आंदोलनात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री. एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, पत्रकार बंधू – भगिनी आणि जनता यांचा सहभाग असणार आहे.












