पुणे : राज्यावर असलेले अंशतः ढगाळ वातावरण निवळले आहे. राज्यभरात कोरडे वातावरण निर्माण झाले आहे. गुजरात, राजस्थानवरून उष्ण वारे राज्यात येत असल्यामुळे कमाल तापमानात वाढ होत आहे. सोमवारी मालेगावात पारा ४४ अंशांवर पोहोचला. किनारपट्टीलाही उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागला. सांताक्रुजमध्ये पारा ३९.१ अंश सेल्सिअसवर गेल्यामुळे मुंबईकरांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागला.
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्रात प्रत्यावर्ती वारे सक्रिय आहे. त्यामुळे वायव्येकडून येणारी उष्णता, तयार झालेला हवेचा उच्च दाब आणि त्यातून स्थिरावलेल्या वेगवान वाऱ्यामुळे कोकणात उष्णतेची लाटसदृश स्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी रविवारच्या तुलनेत किनारपट्टीवर सरासरी दीड ते दोन अंशांनी तापमान वाढले.
सोमवारी मुंबईत ३५.२, सांताक्रुजमध्ये ३९.१, अलिबागमध्ये ३५.२ आणि डहाणूत ३६.४ अंश सेल्सिअस तापमान होते. आज, मंगळवारीही ठाणे, रायगड, मुंबईला उष्णतेसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात सध्या दक्षिणोत्तर वारा खंडितता प्रणाली तयार झाली आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग मंदावला आहे. त्यामुळे रात्री आणि पहाटेही उकाडा जाणवत आहे. पुढील दोन-तीन दिवस अशीच स्थिती राहणार असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात रात्रीच्या उकाड्यात वाढ होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
उत्तर महाराष्ट्र तापला
गुजरातमधील उष्ण वारे उत्तर महाराष्ट्रातून राज्यात प्रवेश करीत आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र तापला आहे. सोमवारी मालेगावमध्ये राज्यात सर्वाधिक ४४.० अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. सोमवारी जळगावात ४३.४, पुण्यात ४१.८, औरंगाबाद ४१.४, नांदेड ४२.८, अकोला ४२.३, नागपूर ४०.१, अलिबाग आणि मुंबईत ३५.२, तर डहाणूत ३६.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.