राज्यात तापमानाचा पारा वाढल्याने उष्माघाताचा धोका वाढला! राज्यात १३ रुग्णांची नोंद; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक प्रादुर्भाव
राज्यात तापमानाचा पारा वाढल्याने उष्माघाताचे प्रकार वाढू लागले आहेत. राज्यभरात मार्च महिन्यात उष्माघाताची १३ प्रकरणे सार्वजनिक आरोग्य विभागाने नोंदविली आहेत. उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांना दक्ष राहण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. तसेच, नागरिकांनी उन्हात बाहेर पडताना योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
राज्यात १ ते २० मार्च या कालावधीत उष्माघाताच्या १३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक चार जण बीड जिल्ह्यातील आहेत. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील दोन आणि अहमदनगर, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, धुळे, सातारा जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. राज्यात अद्याप उष्माघाताने एकही मृत्यू झालेला नाही. राज्यात गेल्या वर्षी १ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत उष्माघाताने २२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यातील सर्वाधिक १३ मृत्यू औरंगाबाद जिल्ह्यातील होते.
राज्यात उष्माघाताचे रुग्ण वाढू लागल्याने आरोग्य विभागाने सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि महापालिकांचे वैद्यकीय अधिकारी यांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत आरोग्य सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार म्हणाले, की राज्यात बऱ्याच भागात उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यभरातील आरोग्य यंत्रणांना उष्माघाताबद्दल दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उष्माघाताच्या रुग्णांची काळजी कशी घ्यावी, याबद्दलही सूचना करण्यात आल्या आहेत.
उष्णतेशी निगडित आजार वाढण्याची शक्यता असल्याने आरोग्य यंत्रणांनी त्याबाबत उपचाराचे नियोजन करावे. या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा रुग्णालयांमध्ये ठेवावा. या आजारांवरील उपचारांचे प्रशिक्षण रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना द्यावे. लहान मुले आणि ज्येष्ठांना उष्माघाताचा धोका अधिक असल्याने त्यांची काळजी घेण्याबाबत जनजागृती करावी. उष्माघातापासून बचाव करण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती जनतेला द्यावी, असे निर्देश देण्यात आल्याचेही डॉ. पवार यांनी सांगितले.
अश्याप्रकारे करू शकता उष्माघातापासून संरक्षण…
- दिवसभरात भरपूर पाणी प्यावे
- कॅफीनयुक्त पेये अथवा मद्य टाळा
- तीव्र उन्हात जाणे टाळा
- सौम्य रंगाचे सुती कपडे वापरा
- लहान मुले, ज्येष्ठांची काळजी घ्या
- पंख्यासह वातानुकूलन यंत्रणेचा वापर करा
- दुपारच्या वेळी बाहेरील सार्वजनिक कार्यक्रम टाळा