पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.१३ : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा ११२ वा वर्धापन दिनी या आर्थिक वर्ष अखेरीस २३ हजार कोटी रुपयांच्या ठेवींचे उद्दिष्ट गाठण्याचा संकल्प प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केला.
राज्य बँकेच्या मुख्य कार्यालयात, तसेच पुण्यासह अन्य विभागीय कार्यालयांमध्ये वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त कर्मचाऱ्यांतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ११२ व्या वर्धापन दिनानिमित्त ११२ रक्तदात्यांचे उद्दिष्ट महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक ऑफिसर्स असोसिएशनने ठेवले होते. प्रत्यक्षात ११६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
तसेच २७ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर अवयव दानासाठी नोंदणी केली. या वेळी प्रशासक अनास्कर, व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे, मुख्य सरव्यवस्थापक डॉ. अशोक माने, उपसरव्यवस्थापिका डॉ. तेजल कोरडे यांच्यासह डॉ. तात्याराव लहाने, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडि, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, कोल्हापूर जिल्हा बँकेच्या संचालिका श्रुतिका काटकर, बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
वर्धापनदिनानिमित्त बँकेच्या बचत विभागाकडून आयोजित ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. बँकेच्या ऑफिसर्स असोसिएशनने मुख्य कार्यालयात कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी छोटेखानी ग्रंथालय उभारण्याचा संकल्प केला.
नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेकडून राज्य बँकेच्या वाशी येथील शिखर प्रशिक्षण व संशोधन संस्थेला २०२१-२२ चा उत्कृष्ट कामगिरीबद्दलचा पुरस्कार नुकताच मिळाला. त्यावर प्रशासक अनास्कर यांनी या प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. बँकेच्या आर्थिक प्रगतीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनाचे श्रेय असल्याचे त्यांनी नमूद केले.












