महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकेकाळी एकमेव आमदार अशी ओळख असलेले जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे पुन्हा आपल्या स्वगृही परतण्याची शक्यता आहे. शिवसेनेत उभी फूट पडून राज्यात शिंदे-फडणवीसांचे सरकार आल्यानंतर शरद सोनवणे हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी झाले होते. सध्या त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणात झालेला गोंधळ आणि जुन्नर तालुक्यातील बदललेली राजकीय समीकरणे पाहता माजी आमदार सोनवणे पुन्हा मनसेमध्ये परतण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील संकेत स्वत: सोनवणे यांनी दिले आहेत. मंगळवारी आमदार लोकार्पण सोहळ्याला राज ठाकरेंसोबत ते पहायला मिळाले.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुणे ग्रामीणचा दौरा सुरू केला आहे. राज ठाकरे जुन्नर तालुक्यातील ओझर येथील भक्ती शक्ती शिल्पाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मंगळवारी आले होते. त्यावेळी सोनवणे हे ठाकरे यांच्याबरोबर पाहायला मिळाले. त्यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर कार्यक्रमाला हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
त्यामुळे शरद सोनवणे पुन्हा मनसेमध्ये येतात की काय ? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यातच सोनवणे यांनी ‘राजकारणात कधी काहीही घडू शकते, आगे आगे होता है क्या’, अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे हे माझ्यासाठी दैवत असल्याचा पुनरुच्चार देखील आमदार सोनवणे यांनी केला. त्यामुळे सध्याची राजकारणाची झालेली मिसळ बघता राज ठाकरेंना आपल्या जुन्या शिलेदाराची साथ मिळणार का ? हे येत्या काळात स्पष्ट होईल.