पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १९ : रात्रीच्या वेळी दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे.
पिंपरी – चिंचवड परिसरात होणाऱ्या जबरी चोरीच्या घटनेत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या गुन्ह्यांवर निर्बंध घालण्यात यावे यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे.
या अनुषंगाने वाकड पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना साहिल एलिगन्स सोसायटी,थेरगाव येथे रात्री ०३:०० च्या सुमारास ४ ते ५ इसमांच्या संशयास्पद हालचाली पोलिसांना जाणवल्या.पोलिस सापळा रचून सर्व इसमांना ताब्यात घेत असताना अंधाराचा फायदा घेऊन एक जण पळून गेला असून त्याच्या इतर चार साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.
शाम हरी गाडवे ( वय २१ वर्षे, रा. दळवीनगर, पांढरकरचाळ, आकुर्डी, निगडी ), अतिष भारत सिरसाट ( वय १९ वर्षे, रा. लिंकरोड पत्राशेड, म्हसोबा सोसायटी, चिंचवड ), नवनाथ दिगंबर साठे ( वय ३५ वर्षे, रा. कैलास कॉलनी, थेरगाव ), शुभम सिद्राम कांबळे ( वय १९ वर्षे, रा. पत्राशेड झोपडपट्टी, भाटनगर, पिंपरी पुणे ) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे असून करण ऊर्फ कल्ला टाक ( रा. धोबीघाट, पत्राशेड, पिंपरी ) हा आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून गेला आहे.
आरोपींचा अधिक तपास केला असता त्यांच्याजवळ तीन लोखंडी कोयते,मिरची पावडर,एक मोबाईल,एक तीन चाकी टेम्पो व एक दुचाकी असा मुद्देमाल सापडला आहे.तसेच वाकड परिसरात बंद असलेली दुकाने, मॉल आणि बिल्डिंगचे काम सुरू असलेल्या साईट वरील साहित्य वॉचमनला कोयत्याचा धाक दाखवून लुबाडून नेणार असल्याचे त्यांनी कबूल केले.
आरोपींवर भादवी कलम ३९९,४०२ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) १३५ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून चार जणांना अटक करण्यात आले आहे. एका आरोपीचा शोध सुरू आहे.
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सी, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. डॉ. श्री. संजय शिंदे सो सह पोलीस आयुक्त मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. डॉ. श्री. काकासाहेब डोळे सो, पोलीस उप आयुक्त, परि २ पिंपरी चिंचवड, मा. डॉ. श्री. विशाल हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड, मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि शंतनु नाईक निंबाळकर, सपोफी, राजेंद्र काळे, पोहवा बंदु गिरे, पोना, अतिक शेख, पोशि रमेश खेडकर व पोना गिलबीले व पोशि लोखंडे यांनी मिळून केली आहे.












