पिंपरी(प्रतिनिधी) : निगडी येथील नृत्यकला मंदिराच्या नृत्य कलावंतांनी राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करण्याची परंपरा १८ वर्षे कायम ठेवली. गुरुपौर्णिमा दिना निमित्ताने राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धेत यशस्वी नृत्य कलाकार आणि शिष्यांचा सत्कार करून एक आगळीवेगळी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
यावेळी सिने नाट्यअभिनेते डॉ संजीवकुमार पाटील, नृत्य दिग्दर्शिका भक्ती नाईक, रत्नम मुर्ती , नृत्यकला मंदिराच्या संचालिका गुरू तेजश्री अडिगे, उपाध्यक्ष अविनाश अडिगे, आरोग्य समुपदेशक विंदा कनयाळकर आदी उपस्थित होते.
सौ.अडिगे म्हणाल्या कि,
गुरुपौर्णिमा पारंपारिक रित्या नेहमीच गुरुचे पूजन आणि त्याला नमन करून साजरी केली जाते. पण जेव्हा शिष्य अति उत्कृष्ट नृत्य कलेचे सादरीकरण करतात आणि राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर आपल्या कलेचा दर्जा उंचावतात तेव्हा गुरूला सन्मान मिळतो आणि तीच खरी गुरुपौर्णिमा होय. म्हणूनच शिष्यांचा सन्मान करणं हा एकार्थी गुरूंचा झालेला सन्मान आहे… शास्त्रीय नृत्य म्हणजे एक साधना आहे त्याला अनेक वर्ष वेळ द्यावा लागतो.लोकनृत्य हा माझा प्राण आहे. .ज्यांना शास्त्रीय नृत्य करायला जमत नाही त्यांनी भारतीय लोकनृत्य शिकले पाहिजेत.
भक्ती नाईक म्हणाल्या कि, नृत्या शिकण्यासाठी वय,वर्ण तसेच शरीर यष्टी आड येत नाही. कोणालाही कधीही नृत्य शिकता येते आणि ते शिकले पाहिजे.
मुंबईत गेल्यावर प्रभू देवासोबतच मला सहाय्यक नृत्य दिग्दर्शिका म्हणून काम करण्याची संधी मिळाली.त्यानंतर मधूर भांडारकर,विधू विनोद चोप्रा,अनिल कपूर, सोनम कपूर यांच्यासोबतदेखील काम केले.
डॉ पाटील म्हणाले कि, कुठलीही कला माणसाला जिवंत ठेवते. प्रयत्न हाच परमेश्वर आहे.सरावातून आपल्याला आनंद मिळतो. यशामागे धावताना अपयश देखील पचवता आले पाहिजेत तर यश नम्रतेने स्वीकारले पाहिजेत.
आयुष्यात जे आवडते ते करा. हसा भरपूर , हास्य हे उत्तम औषध आहे.जे कराल ते मन लावून करा.नृत्य, अभिनय गायन अशी कोणतीही कला शिकताना सराव महत्त्वाचा असतो.असा सल्ला दिला.
निगडी येथील कै मनोहर वाढोकर सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.तसेच नृत्यकला चे अति उत्कृष्ट ५ विद्यार्थी नृत्य सादर केले.
तसेच नृत्यकलामध्ये नृत्य शिकणाऱ्या आई-मुलगी अशा चार जोडप्यांनी यावेळी नृत्यकला सादर केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी घुमर.., राधा हि बावरी,कोळीगीत,सत्यम शिवम सुंदरम सादर करून रसिकांची दाद मिळवली.
राष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त केलेल्या नर्तकी शर्वरी खत्री,महेश्वरी जोशी,हरिप्रिया चौधरी,जागृती राणा,अंशिता बारगळ,मृण्मयी मेरुकर,तन्वी एकदारी,वीणा भोसले,अपूर्वा क्षीरसागर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच वरिष्ठ विद्यार्थीनी विदुल्लता खत्री, आदिती रानवडे यांना सन्मानित करण्यात आले.












