पुणे प्रतिनिधी
फुलवडे ३० : फुलवडे (ता. आंबेगाव) पासून पुढे दोन किलोमीटर अंतरावर डिंभे धरण पाणलोट क्षेत्रालगत असलेला फुलवडे ते आहुपे रिंगरोड वरील मोरीचा कठडा खचला असून त्याबाबत तत्काळ उपाययोजना न केल्यास या भागातील दळणवळण व्यवस्था पूर्णपणे कोलमडू शकते. त्यामुळे या मोरीवरील कठडा त्वरित दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी येथील स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
डिंभे ते आहुपे हा आदिबासी दुर्गम भागातील दळणवळणासाठी ४५ किलोमीटरचा एकमेव अरुंद रस्ता आहे. धरण पाणलोट क्षेत्रालगतच्या या रस्त्यावरून एसटी, टेम्पो, पिकअप, जीप यासारखी चारचाकी व दुचाकी वाहने जा-ये करतात.
या भागातील नागरिक, व्यापारी, नोकरदार, आजारी रुग्णांना तसेच शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना डिंभे, शिनोली, घोडेगाव, मंचर याठिकाणी जाण्यास हाच एकमेव रस्ता असल्याने हा रस्ता जर बंद झाला तर या भागातील दळणवळण व्यवस्था पूर्णपणे कोलमडू शकते. त्यामुळे कठडा खचलेल्या ठिकाणी तत्काळ बॅरिगेटिंग करण्यात यावे. जेणेकरून अपघात घडणार नाही. अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.












