अजितदादांचा प्रचार करण्यासाठी गुंड फोन करून धमक्या देत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी, कोणकोणत्या प्रकारे लोकांना आणि समर्थकांना धमकावण्यात येत आहे, याची सविस्तर माहितीच माध्यमांसमोर मांडली.
धमकीचा पहिला प्रकार सांगताना रोहित पवार म्हणाले, ग्रामिण भागात जे लाभार्थी आहेत, त्यांना मलिदा गँग म्हणतात. ते येथील कार्यकत्र्यांना फोन करून सांगत आहेत की, तुम्ही साहेबांचा अथवा ताईंचा प्रचार करायचे धाडस करायचे नाही. जर तसे केले, तर उद्या जाऊन तुम्हाला अनेक अडचणी सोसाव्या लागतील.
धमकीचा दुसरा प्रकार सांगताना ते म्हणाले, दबदबा, पीडीसीसी बँक, त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तुम्हाला लोन दिले जाईल, नाही दिले जाणार, असा धमकीचा प्रचारही केला जात आहे. पुणे शिक्षण मंडळ, तेथे असलेले जे शिक्षक आहेत, त्यांना धमकी दिली जात आहे की, तुम्ही प्रचार करा. नाही तर तुमची बदली करतो.
धमकीचा तिसरा प्रकार सांगताना रोहित पवार म्हणाले, गुंडांच्या माध्यमातून शहरी भागात धमकी दिली जात आहे. काही गुंडांना यादी दिली गेली आहे. जे सुप्रियाताईंचा प्रचार करतात, त्यांना गुंड फोन करतात आणि म्हणतात, या भागात शांतपणे राहायचे असेल, तर अजितदादांचा प्रचार करा, नाही तर आम्ही तुम्हाला बघतो.
रोहित पवार पुढे म्हणाले, हे तिन्ही प्रकार या परिसरासाठी नवीन आहेत. पण दूर्दैवं असे की, अजितदादांचे पदाधिकारी आहेत या सर्व गोष्टींचा वापर करत आहेत. दडपशाही वाढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ही गोष्ट सामान्य नागरिकांना आवडत नाही. आम्हाला वाटते की, हे प्रकार जेवढे वाढतील, तेवढेच सुप्रियाताईंचे लीड वाढेल.