तरुणीला लग्नाचे वचन देऊन, आपण लग्न करणार आसल्याचे सांगून तरुणाने मुलीच्या घरी कोणी नसताना जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच तरुणाच्या आई-वडिलांनी लग्नासाठी दागिने व कपड्यांसाठी खर्च करण्यास भाग पाडले. मात्र, तरुणाने ऐनवेळी लग्नास नकार देऊन तरुणीची फसवणूक केली. हा प्रकार १४ डिसेंबर २०२३ ते आजपर्य़ंत उंड्री येथे घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन तरुणाला अटक केली आहे.
याबाबत उंड्री येथे राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणीने गुरुवारी (दि.८) कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन आदित्य कृष्णन (वय-२८), राजेश्वरी कृष्णन (वय-५४), पी. कृष्णन (वय-५७) यांच्यावर भा.दं.वि. कलम ३७६/२/एन, ४२०, ३४ सह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमाच्या कलम ३(२)(५) नुसार गुन्हा दाखल केला असून आदित्य कृष्णन याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदित्य आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आदित्यने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे वचन दिले. आपण लग्न करणार आहोत असे सांगितले. तसेच तरुणीच्या घरात कोणी नसताना तिच्या इच्छेविरोधात जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तर आरोपीच्या आईने देखील तरुणीला आम्ही तुला स्वीकारले आहे असे वारंवार फोनवर बोलत असताना सांगितले. आरोपींनी लग्नासाठी, दागिन्यासाठी आणि कपड्यांसाठी तरुणीला खर्च करण्यास भाग पाडले. मात्र, आरोपी आदित्य याने ऐनवेळी लग्नास नकार देऊन फसवणूक केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास हडपसर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख करीत आहेत.