पुणे प्रतिनिधी:
ड्रग्ज माफिया ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यावरुन आता सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक खुलासे केले आहेत.
‘ललित पाटील प्रकरणात आम्ही आवाज उठवत आहोत पण गृहखाते आणि आरोग्य खाते यावर लक्ष देत नाही. या प्रकरणात ललित पाटीलसह ससूनचे डीन संजीव ठाकूर यांना सहआरोपी करा, तसेच या प्रकरणी नेमलेल्या समितीने संजीव ठाकूर यांची नार्को टेस्ट करा,” अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. तसेच याप्रकरणी कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचाही इशारा त्यांनी यावेळी दिली. “गृहमंत्री साहेब आम्हालाही कायदा माहिती आहे. कुठली माहिती गोपनीय आणि कुठली ओपन करावी हे आम्हाला माहिती आहे. ललित पाटील प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलाय हे सांगू नका, मात्र ललित पाटीलवर काय उपचार सुरू होते, याची माहिती द्या..” असेही अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या प्रकरणात भाजपच्या काही नेत्यांचा सहभाग असल्याचेही म्हंटले जात आहे. त्यावरून सुषमा अंधारे यांनी साधलेला निशाणा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.












