पुणे प्रतिनिधी
जुनी सांगवी – सांगवी पोलिस स्टेशन अंतर्गत पिंपळे सौदागर चौकीतील सुनिल शहाजी जाधव वय ४९ वर्षे पद सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्ग ३ यांना एका महिलेच्या तक्रारीवरून पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याने सांगवी पोलिस स्टेशन लाच प्रकरणी पुन्हा चर्चेत आले आहे.. सर्वसामान्यांमधील प्रतिमा यामुळे डागाळली आहे.
पिंपळे सौदागर येथील एका महिला तक्रारदाराचे घराचे बांधकाम पिंपळे सौदागर येथे चालू असून सदर बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट एका बांधकाम व्यवसायिकास दिले होते. घराचे बांधकामाबाबत कॉन्ट्रॅक्टर व तक्रारदार यांच्यात करार झाला होता. करारानुसार बांधकाम व्यवसायिक यांनी काम वेळेत पूर्ण केले नाही व तक्रारदार यांचे ताब्यात असलेले कॉन्ट्रॅक्टरचे बांधकामाचे साहित्य कॉन्ट्रॅक्टर हे तक्रारदार यांच्याकडे मागत होते.
परंतु सदरचे बांधकाम पूर्ण झाल्यावर बांधकाम साहित्य देण्यात येईल असे तक्रारदार यांनी त्या बांधकाम व्यवसायिकास सांगितले. त्यामुळे बांधकाम व्यवसायिकाने तक्रारदार यांचे विरोधात सांगवी पोलीस ठाणे येथे तक्रार केली होती. सदर तक्रारी वरून तक्रारदार यांचे विरुद्ध कारवाई न करण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिस अधिका-याने तक्रारदार यांच्याकडे प्रथम साठ हजार रुपयाची पंचा समक्ष लाचेची मागणी करून तडजोडी अंती पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली.
यात तक्रारदारास दोन टप्प्यात लाचेचे पैसे देण्यास सांगून तक्रारदार यांचे कडून पहिल्या टप्प्यातील रक्कम रुपये पंचवीस हजार लाच स्वीकारली असता त्यांना पिंपळे सौदागर पोलीस चौकी येथे रंगेहाथ पकडण्यात आले. बुधवार ता.१८ त्यांचे विरुद्ध सांगवी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
२१ डिसेंबर २०२० ला सांगवी पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वीस हजाराची लाच स्वीकारताना कारवाई केली होती. या प्रकरणात तक्रारदाराने स्वतः साठी पोलिस सुरक्षा मागितली होती. याबदल्यात वीस हजार रुपयांची लाच मागितली होती.पुन्हा लाच प्रकरण घडल्याने सांगवी पोलिस स्टेशन पुन्हा चर्चेत आले आहे. तर सर्वसामान्यांच्या तक्रारींचे काय होत असेल असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रणेता सांगोलकर, पोलीस निरीक्षक, पो.शि. प्रवीण तावरे, कोमल शेटे, सौरभ महाशब्द स.फौ.चा. चव्हाण यांनी मार्गदर्शन अधिकारी
श्री अमोल तांबे,पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे परिक्षेत्र, डॉ. शीतल जानवे, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे. यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.












