लाचलुचपत : आरोपीला अटक न करण्यासाठी दोन लाखांची मागणी करुन त्यातील ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. दरम्यान, संतप्त झालेल्या नागरिकांनी वारे यांच्या विरोधात रोष व्यक्त करुन पोलीस वाहनावर दगडफेक केली. त्यामुळे याठिकाणी काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. एसीबीच्या या कारवाईमुळे नंदुरबार पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ही कारवाई ज्ञानेश्वर वारे यांच्या घरी केली.
गुजरातमध्ये एका आरोपीवर गुन्हा असल्याने अटक न करण्यासाठी पोलीस निरीक्षक वारे यांनी पाच लाखांची मागणी केली होती. तडजोडी अंती दोन लाख रुपये देण्याचे ठरले. त्यातले एक लाख रुपये वारे यांनी यापूर्वीच म्हणजे ५ मार्च रोजी घेतले होते. उर्वरित रकमेतील ५० हजार वारे यांना बुधवारी (दि.२४) त्यांच्या निवासस्थानी देण्यात आले. यावेळी नाशिक एसीबीने वारे यांना सापळा रचून लाच घेताना रंगेहाथ पकडले.
ज्ञानेश्वर वारे यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी नागरिकांच्या मनात रोष आहे. एसीबीने कारवाई केल्याचे समजताच नागरिकांनी वारेंच्या घरावर हल्ला केला. याठिकाणी नागरिकांनी वारेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करुन संताप व्यक्त केला. तसेच पोलीस वाहनावर दगडफेक केली. पोलीस निरीक्षक वारे हे वारंवार खोटे चुकीचे गुन्हे दाखल करत होते. तर भ्रष्ट अधिकारी होते, त्यामुळे यांच्यावर झालेली कारवाई योग्यच असून या जमावाने शासकीय वाहनांवर दगडफेक करून आपला रोष व्यक्त केला.